Phalbaag Lagvad Yojana : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा. असे आवाहन प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे.
फळबाग लागवड (Phalbaag Lagvad Yojana) योजनेत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभूळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ्रूट, केळी, द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. गुलाब, मोगरा व निशीगंध या फुलपिकांसाठी व सन २०२४-२५ या वर्षात बांबू लागवड मोहीम स्वरूपात करण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
Phalbaag Lagvad Yojana
क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी-जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष, विद्यापीठ शिफारशीनुसार अंतर मर्यादेतच देय राहील. अतिरिक्त कलमे, रोपे यांचे अनुदान दिले जाणार नाही.
लागवड वर्षासह सलग ३ वर्षांत मंजूर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती फळपिकांकरिता जे लाभार्थी ९० टक्के फळझाडे जिवंत ठेवतील व कोरडवाहू फळपिकांचे ७५ टक्के फळझाडे जिवंत ठेवतील. अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील.
प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा कमीतकमी ०.०५ हेक्टर व जास्तीतजास्त २.०० हेक्टर आहे. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. सातबारावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक राहील.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना, तसेच अल्प व अत्यल्प, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी ग्रामपंचायतीचे जॉबकार्डधारक असावा, असे लाभार्थी निवडीचे निकष आहेत, अशी माहिती बांदल यांनी दिली.